(बाळासाहेब आपल्या सिंहासनावर विराजमान होऊन बसले आहेत…
उद्धव दाराच्या कोप-यात उभे आहेत... राज ठाकरे दुस-या बाजूला डोक्याला हात लावून उभे आहेत...)
बाळराजे – काकाश्री आपण आम्हाला थेट मातोश्रीवर कशासाठी पाचारण केलंत? निवडणुकीच्या मोहिमेपूर्वी
आम्ही मातोश्रीवर तशरीफ ठेवली होती हे जर आमच्या मावळ्यांना..(जीभ चावत) मनसैनिकांना
समजलं तर गहजब होईल... आपणाला याची कल्पना आहे ना काकाश्री?
काकाश्री – बाळराजे आपण इतकी घाईगडबड करू नका... शांत व्हा...
मला आपल्याशी एका महत्वाच्या
मोहिमेविषयीच बोलायचं आहे. म्हणूनच तुम्हाला मातोश्रीवर बोलावणं केलं आम्ही...
बाळराजे – आज्ञा काकाश्री.. पण जरा लवकर ...
राजगडावर शिलेदार आमच्या वाटेकडे डोळे लावून उभे
आहेत. (प्रचाराच्या) मोहिमेची तयारी झालीय. आता निघण्याची वेळ झालीय.
काकाश्री – (भावनावश होत...) हो..हो... किती घाई करता बाळराजे...
किती बदलला आहात तुम्ही? आता
आमच्यापेक्षा तुम्हाला तुमच्या मनसैनिकांची जास्त चिंता वाटते?
बाळराजे – (डोळ्याला रूमाल लावत)
आम्हाला त्यांनीच हात दिला काकाश्री...आणि तुम्ही....
तुम्ही हात दाखवलात...आता तेच आमच्यासाठी सगळं काही...
काकाश्री – बाळराजे....बाळराजे
आम्हास वाटतं की तुम्ही आणि दादाराजेंनी पुन्हा गुण्यागोविंदानं एकत्र
राज्य...म्हणजे राजकारण करावं... आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचा मुलुख जिंकावा आणि मराठी
जनतेचीही तीच इच्छा आहे...
बाळराजे – (तारस्वरात) ही इच्छावजा आयडिया
आपणाला जोशी सरांनी तर दिली नाही ना?
कारण त्यांना
वा-याची दिशा लवकर कळते... असं मीडियावाले म्हणतात. त्यांनीच ही आयडिया परवा एका
कार्यक्रमात बोलून दाखवली म्हणे... आमची पोहोच लवकरच कोटीच्या घरात जाणार हे त्यांनी
जाणलं असावं... या मोहिमेत काही कोटी मतं नक्कीच घेऊ….
काकाश्री – बाळराजे...आपण मराठी जनतेच्या हितासाठी तरी दादाराजेंना साथ द्यावी...
असं मराठी जनतेला वाटतं...
बाळराजे – मग त्यासाठी आम्ही विलीन का व्हावं?
दादाराजेंनी आम्हाला साथ द्यावी हवी तर... तसेही ते
पुढे गाताना नाही तर मागे साथ देतानाच छान दिसतात...
अर्थात मीडियावाले म्हणतात
काकाश्री – पण, बाळराजे...
दादाराजे – (बाळासाहेबांना थांबवत..आणि आपलं मौन तोडत) पाहा साहेब...
मी म्हटलं नव्हतं, बाळराजे
आपला हट्ट सोडणार नाहीत म्हणून...
बाळराजे – आमचा कसला हट्ट?
आम्ही बाजूला झालोम्हणूनच तुम्हाला ड्रायव्हिंग सीटवर बसण्याची संधी
मिळाली...आता आम्ही बाहेर पडून आमचं बस्तान बसवलंय.
आमची रेल्वे आम्ही स्वत: तयार केलेल्या रूळावर धावते...
पुण्याईवर नाही...
दादाराजे – पाहा साहेब...
बाळराजे आताही आम्हाला टोमणेच मारत आहेत...
परवा युवराज आदित्यलाही त्यांनी भर पत्रकार परिषदेत मिरच्यांची धुरी दिली....
काकाश्री – बाळराजे आवरा स्वत:ला...किमान मराठी माणसासाठी तरी...
बाळराजे - आता कसलं आवरायला सांगता आहात काकाश्री...
आपण आधीच दोर घट्ट धरले असतेत तर
ही वेळ नसती आली काकाश्री
काकाश्री – बाळराजे आता मेलेली मडी उकरून काय फायदा ?
ऐका आमचं...दादाराजेंच्या खांद्याला खांदा
लावून काम करा... निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धडा शिकवा...
विधानसभेवर भगवा फडकवा...
दादाराजे – हो... हो... आम्ही मुंबापुरी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या
मुलखावर बारीक नजर ठेवतो.
आणि आपण विदर्भ आणि कोकणावर पकड मजबूत करा...
मग पाहा काय चमत्कार होतो ते...
बाळराजे – हीच तर तुमची खोड आहे दादाराजे...
नेहमीच तुम्ही आमच्या वाट्याला काटे दिले आणि आपण
फुलांच्या झोक्यावर झुलत राहिलात...
दादाराजे – मी म्हटलं नव्हतं साहेब..
बाळराजे कधीच हेका सोडणार नाहीत... त्यांनी मागच्या मोहिमेतही
आम्हाला मान खाली घालायला लावली... सवयीप्रमाणे
बाळराजे – (कुत्सित हसत...) हमममम...
दादाराजे – साहेब, बाळराजेंना आवरा...
काकाश्री – (अंमळ रागानं )बाळराजे आणि दादाराजे
आपल्यायाच गृहकलहामुळे आमची मेहनत आणि
मशागत फुकट जातेय....समजलं ?
आता तुम्हा दोघांसाठी आमचा आदेश (बांदेकर) आहे...
आजपासून या क्षणापासून आपण मराठी माणसासाठी एकत्र येऊन काम करावं...
त्यासाठी काहीही करावं लागलं तरी चालेल...
आमच्यासाठी एव्हढं करा...अवघ्या महाराष्ट्राची इच्छा आहे.
बाळराजे आणि दादाराजे – (एकमेकांकडे न पाहता... थोड्याविचारानंतर)
आपली आज्ञा शिरसावंद्य...
आम्ही आजपासून एकत्र काम करू... पाहाच दिवाळीनंतर
विधानसभेवर भगवा फडकत असेल....
चिमणराव –
(दचकून उठत... घडाळ्यात पाहतात... चक्क सकाळचे साडेनऊ वाजलेले असतात.
इतकं गोड स्वप्नं पडलं होतं की सातचा गजर वाजून वाजून बंद झाला तरी ऐकू आला नाही
म्हणत बाथरूमकडे जातात.)
बायकोला उद्देशून- हाक नाही का मारता येत? आता मला नऊ छप्पनची
लोकल कशी मिळणार ?
पार्वतीबाई - (चहाचं आदण ठेवतात खलबत्त्यात आलंटाकताना)
छप्पनदा आवाज दिला पण ऐकू येईल तर शपथ
तुम्हाला...दिवसा कसली स्वप्नं पाहतात कुणास ठाऊक...?
चिमणराव – (स्वतःशीच म्हणतात...
डोक्यातून दोन आवाज जात नाहीएत
एक खलबत्याचा आणि
दुसरा ,,,,,
मराठी माणसा जागा हो या घोषणेचा)